मनोरंजन

शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव करून देणारा “छत्रपती शासन”

नुसतंच जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांच्या आदर्शांची, विचारांची आणि तत्त्वांची कास धरण्याची आता गरज आली आहे. त्यांची नेमकी भूमिका मांडणारा ‘छत्रपती शासन’ सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित ‘छत्रपती शासन’ सिनेमा उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती आहे. आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाही बद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे. नुकताच या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या सिनेमाच्या निमिर्तीचा आणि दिग्दर्शनाचा प्रवास अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने मांडला.
सिनेमातील चारही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. विशेष म्हणजे सिनेमातील प्रत्येक गाण्याचं संगीत  दिग्दर्शन वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी केलं आहे. अतिशय प्रेरक आणि स्फूर्ती देणारा ‘शिवबा छत्रपती’… हा पोवाडा नंदेश उमप यांनी गायला, लिहिला आणि संगीत दिग्दर्शित देखील केला आहे. गायिका जान्हवी प्रभू-अरोरा हिच्या भन्नाट आवाजातील ‘मिशीवाला पाहुणा’… या आयटम सॉंगचं संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडे यांचं आहे. या दोन्ही गाण्यांना डॉ विनायक पवार यांनी शब्धबद्ध केलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या गावरान ठसकेबाज आवाजातील ‘वाढीव दिसताय राव;… ही धमाकेदार लावणी दीपक गायकवाड यांनी लिहिली असून सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केली आहे. या लावणीचं विशेष म्हणजे एका पुरुष कलाकाराने स्त्री वेशभूषा परिधान करत ही लावणी सादर केली आहे. सिनेमाची कथा गुंफणारं आणि रंगत वाढवणारं ‘मर्द मराठ्यांचं पोर’… हे गाणं अभिजीत जाधव आणि राजन सरवदे यांनी गायन, लेखन, संगीत दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण, यांच्या भूमिका आहेत. तसेच श्रीशा म्हेत्रे, रोमित भूजबळ, राजवर्धन धुसानीस, रेवा जैन ही बालकलाकार मंडळी देखील दिसणार आहेत. या सिनेमाची कथा आणि संवाद देखील खुशाल म्हेत्रे यांचेच आहेत. तर पटकथा कमलेश भांडवलकर यांची आहे. सुनील बोरकर, निशांत भागवत आणि योगेश कोळी यांनी सिनेमाचं छायांकन केलं आहे तसेच संकलन चेतन सागडे, कलादिग्दर्शन नितेश नांदगावकर, आंनद साठे, वेशभूषा प्रथमेश मांढरे, रंगभूषा पिंटो सोलापूरे, नृत्यदिग्दर्शन भक्ती नाईक यांचं आहे.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »