महाराष्ट्र राजकारण राज्य

राज्यात 46 लाखांची हरित सेना तुम्हीही हरित सेनेचे सदस्य व्हा…

मुंबई, दि. 29 : राज्यात लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज्यभरात ४६ लाख लोकांची हरित सेना सज्ज झाली आहे. २६ मार्च २०१८ रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यात ४६ लाख ८ हजार ७९५ लोकांनी तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

यामध्ये सर्वाधिक नोंदणी लातूर जिल्ह्यात झाली असून ती ४ लाख ६६ हजार १६७ इतकी आहे. त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ३ लाख ९९ हजार ६६० तर बीड जिल्ह्यात ३ लाख ५५ हजार ३७४ इतकी हरित सेनेची नोंदणी झाली आहे. चौथ्या स्थानावर नाशिक जिल्हा असून तिथे २ लाख ७२ हजार १८५  नोंदणी झाली आहे. पाचव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे. तिथे २ लाख २७ हजार ५४० हरित सैनिकांची नोंद झाली आहे.

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे म्हणून वन विभागाने ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्याचे निश्चित केले आणि राज्यभरातून त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेच http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.

सध्या नोंदणीकृत झालेल्या ४६ लाख ८ हजार ७९५ हरित सैनिकांमध्ये ७५ हजार ९४४ संस्थांचा समावेश आहे. या माध्यमातून २८ लाख ८१ हजार ६३५ लोकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे तर वैयक्तिकस्तरावर सदस्यत्व स्वीकारलेल्या लोकांची संख्या १७ लाख २७ हजार १६० इतकी आहे.

हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी १ कोटी लोकांची फौज राज्यात निर्माण करण्याचा निर्धार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक हा देशांच्या सीमांचे रक्षण करतो तर हरित सेनेच्या माध्यमातून हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारलेला सैनिक हा खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षणाचा दूत असल्याचे वनमंत्री सांगतात.

वन विभागाने हरित सेनेच्या स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट करताना त्यांचा सहभाग अपेक्षित असलेली क्षेत्र निश्चित करून दिली आहेत. जसे वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी,वनांच्या संरक्षणाकरिता सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात वणवा विझवण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग, वन्य प्राण्यांच्या गणनेत सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासारख्या दिन विशेषांच्या कार्यक्रमात, वनमहोत्सव, वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हरित सेनेच्या सदस्यांना सहभागी होता येणार आहे. हरित सेनेच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर या सर्व विषयांची सविस्तर माहिती मिळते. शिवाय याठिकाणी वन विभागाची दिनदर्शिकाही देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेप्रमाणेही हरित सेनेचे सदस्य कार्यक्रम घेऊन पर्यावरण-वन रक्षणात आणि संवर्धनात आपले योगदान देऊ शकतात. गरज आहे सर्वांनी पुढं येऊन या वसुंधरेला अजून सूंदर करण्याची, स्वच्छ आणि सूंदर पर्यावरण राखण्याची, त्यामुळे मी हरित सेनेचा सदस्य झालो, तुम्ही झालात का, असे आज पर्यावरणप्रेमी एकमेकांना आवर्जुन विचारताना दिसत आहेत.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »