आंतरराष्ट्रीय आरोग्य उत्तर प्रदेश उत्तराखंड क्रिडा जरा हटके धर्म पंजाब मनोरंजन महाराष्ट्र राजकारण राजस्थान राज्य राष्ट्रीय व्यवसाय हरियाणा

नागपूरचे विमानतळ देशात सर्वोत्कृष्ट ठरेल – मुख्यमंत्री

Ø  मनिषनगर रेल्वे उड्डाणपुलासह विविध विकासकामांचा शुभारंभ

Ø  राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा 750 कोटी रुपयांचा विकास आराखडा

Ø  पुर्व नागपूरला जोडणाऱ्या डिपी रोडला मान्यता

Ø  पेरीअर्बन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

Ø  बेलतरोडी पोलिस स्टेशनचे उद्घाटन

Ø  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे भूमीपूजन

नागपूर, दि. 28 :   नागपूर येथील  विमानतळाच्या विकासाला मान्यता देण्यात आली असून येत्या दोन महिन्यात बांधकामाला सुरुवात होत आहे. देशातील सर्वांत सुंदर व उत्कृष्ट विमानतळ म्हणून विकास करतांनाच येथे कार्गोची अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

श्यामनगर परिसरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रांगणात आयेाजित नागपूरकरांसाठी महत्वपूर्ण अशा उज्ज्वलनगर ते मनिषनगरला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलासह फ्लायओवर व अंडरपासचे ई- भूमीपूजन, नागपूर पेरीअर्बन योजनेअंतर्गत दहा गावांचा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ, जिल्ह्यातील 20 पाणीपुरवठा योजना भूमीजपूजन तसेच बेलतरोडी पोलिस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे तसेच  प्रभागाचे सर्व नगरसेवक, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एन. चंद्रशेखर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन विमानतळाच्या विकासासाठी मान्यता देण्यात आले असून या संदर्भातील निविदा काढण्यात आल्या असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून येथे कार्गोचे काम सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. नवीन विमानतळामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार असून कार्गोच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सुमारे 750 कोटी रुपयाच्या विकास आराखडयाला नुकतीच मान्यता देण्यात आली असून हे विद्यापीठ देशातील सर्वांत सुंदर विद्यापीठ विकसीत करण्यात येणार आहे. सुसज्ज कॅम्पस तयार करतांना पहिल्या टप्प्यासाठी 200 कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून ही कामे लवकरच सुरु होतील असेही, त्यांनी यावेळी सांगितले.

वर्धा रोड ते मनिषनगरला जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी मागील दहावर्षापासून संघर्ष केला असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले रेल्वे उड्डाणपुल नसल्यामुळे लोकांना मोठया प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत होता. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी या रेल्वे उड्डाणपुलाचे उत्कृष्ट डिझाईन तयार केले असून ते राज्यातील सर्वोत्कृष्ट राहणार आहे. त्यासोबतच रेल्वे अंडरपासच्या बांधकामाचा शुभारंभ करुन या भागाच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा दिल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून नितीन गडकरी यांचे यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले.

नागपूर शहरासह परिसराचा मोठया प्रमाणात विकास होत असतांना सभोवतालच्या दहा गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या पेरीअर्बन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेच्या सुरक्षतेसाठी कमीत कमी वेळात पोहाचावे या दृष्टीने पोलिस दलाच्या सक्षमीकरणासोबतच पोलिस स्टेशनच्या  आणि अन्य बांधकामासाठी 800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वेगवेगळया माध्यमातून जनतेला प्रभावी व परिणामकारक सेवा पुरविण्यासाठी नागपूर शहर पोलिस सक्षमपणे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करुन देत असतांना स्वच्छतेलाही प्राधान्य दिल्यामुळे राज्यात मागील तीन वर्षांत मोठया प्रमाणात काम सुरु झाले आहे. श्यामनगर प्रभागामध्ये यापुर्वी 36 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी देण्यात आले असून यावर्षीही  सुद्धा 24 कोटी रुपये देण्यात आले आहे. वर्धा रोडला जोडणाऱ्या डीपी प्लानला लवकरच मान्यता देण्यात येत असून यासाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. नवीन रेल्वे उड्डाणपुलासाठी 22 घरे बाधित होणार असून त्यांच्या पर्यायी जागेसह पुनर्वसनाचे काम प्राधान्याने करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

अध्यक्षीय भाषणात केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून सुरु असलेली सर्व कामे येत्या दोन वर्षांत पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी केल्यात. मेट्रो रिजन आराखडयामुळे शहराच्या  बाहेरील परिसराचा विकास होणार आहे. नागरिकांनीही नियमानुसारच घराचे बांधकाम करावे तसेच कुठेही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसचे रस्ते मोठे करत असतांना अतिक्रमण प्राधान्याने  दूर करावे, असेही ते म्हणाले.

पाणीपुरवठा  व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 239 कोटी रुपये खर्च करुन दोन वर्षांत 10 गावांसाठी पेरीअर्बन योजना पुर्ण करण्यात आली असल्याचे सांगतांना निधी अभावी राज्यात 5 हजार 600 योजना बंद होत्या परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनांना आवश्यक निधी दिल्यामुळे  तीन वर्षांत पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रथमच मुख्यमंत्री पेयजल योजना सुरु करुन यासाठी अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. स्वच्छतेमध्ये सुद्धा देशात उत्कृष्ट काम झाले असून 17 जिल्हे, 24 हजार ग्रामपंचायती व 44 हजार गावे हागणदारीमुक्त झाले आहेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे राज्यातील जनतेला पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणात योजनांची अंमलबजावणी शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर मेट्रो रिजन आराखडयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यामुळे सुमारे दहा लक्ष घरे नियमित होणार असल्याचे सांगतांना शहराभवती असलेल्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत दहा गावांची योजना दोन वर्षांत पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेत 25 एमएलडी पाणी अतिरिक्त असल्यामुळे यासाठी तीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 46 योजनापैकी 39 योजना मंजूर झाले आहेत. त्यापैंकी 19 योजनांचे ई भूमिपुजन केल्यामुळे 58 हजार लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार आहे. जिल्ह्यात 30 नळ योजनांना मंजूरी  करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेरीअर्बन योजनेअंतर्गत प्रादेशिक पाणिपुरवठा योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री, ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 20 पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपुजन, उज्जव नगर ते मनिषनगरला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुल तसेच बेलतरोडी पोलिस स्टेशनचे उद्घाटन केले.

यावेळी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची माहिती मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी, बेलतरोडी पोलिस स्टेशन संदर्भात उपपोलिस आयुक्त चैतन्य कुमार यांनी तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी एम.चंद्रशेखर यांनी मनिषनगर उड्डाणपुलासंदर्भात माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश कुमार यांनी मानले.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »