आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र राजकारण राज्य राष्ट्रीय

चंद्रपूरने अनुभवला आदिवासी मुलांना शुभेच्छा देणारा भावनिक सोहळा

प्रतिकूलतेवर मात करण्याची आदिवासींची

उपजत ताकद; एव्हरेस्ट सर करेल: विष्णू सवरा

चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील- मुनगंटीवार

 चंद्रपूर, दि.8 :  कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील  आदिवासी शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील दोन दिग्गज मंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर यशस्वी व्हा ! अशी प्रेमाची थाप दिली आणि यासोबतच प्रवास सुरु झाला गडचांदा ते एव्हरेस्टचा !

            चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील 10 आदिवासी विद्यार्थी 10 एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. आज चंद्रपूरमध्ये खचाखच भरलेल्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शितारामआडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत,राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, प्रशिक्षक विमला नेगी देवसकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून परिश्रम घेणारे सद्याचे गोदिंया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी आदींच्या प्रोत्साहनपर शब्दानंतर या 10 आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात चंद्रपूरचा झेंडा दिला गेला. त्यावेळी अवघ्या सभागृहाने टाळयांचा कडकडाट करीत या मुलांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी व्यासपिठावर चंद्रपूर शहराच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

            या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी गेल्या वर्षभरात केलेल्या खडतर परिश्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. काही मिनीटांच्या या चित्रफितीने मुलांच्या साहसाची कल्पना आली. सोबतच एव्हरेस्ट चढून जाणे हे किती कठीण काम आहे. त्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द आणि पैसा याचीही सभागृहातील उपस्थितांना कल्पना आली. यावेळी महाराष्ट्राचा झेंडा खांदयावर घेऊन मुलांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी परवानगी देणाऱ्या आदिवासी मुलांच्या आई वडीलांचा सत्कार करण्यात आला. 10 मुलांपैकी दोघांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातील आत्मविश्वास त्यांच्या यशाची खात्री देत होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या 10 मुलांसाठी शुभेच्छा गिफ्ट म्हणून टॅब वितरीत केले.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »